मुंबई : मध्य रेल्वेवर काही तासांच्या अंतरावर दोन विद्यार्थिनींचा रेल्वे अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पदव्युत्तर परीक्षेसाठी निघालेली तेजश्री वैद्य ही विद्यार्थिनी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सायन-माटुंगादरम्यान धावत्या रेल्वेतून पडली. सुमारे सव्वा तास तेजश्री जखमी अवस्थेत रुळांदरम्यानच्या नाल्यात पडून होती. तर, सकाळी ११ वाजेच्या सुमारास ज्योती वर्मा या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विद्याविहारला रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाला.रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर साठे महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तेजश्रीने प्रवेश घेतला. शुक्रवारी परीक्षेसाठी घाटकोपर येथून तिने ९च्या सुमारास लोकल पकडली. गर्दी असल्यामुळे आत जाणे तिला शक्य झाले नाही. दरवाजावर उभी असताना तोल गेल्याने ती सायन-माटुंगादरम्यान कोसळली. रेल्वे रुळांलगत असलेल्या नाल्यांमध्ये ती सव्वा तास पडून होती.सकाळी साडेअकराच्या सुमारास तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे. ती बेशुद्धावस्थेत आहे, अशी माहिती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली. तर तेजश्री बेशुद्धावस्थेत असली तरी तिच्या हात आणि पायांची हालचाल होत असल्याची माहिती तेजश्रीची आई स्वाती वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रेल्वे रुळावर अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळण्याची गरज असल्याचे मत साठे महाविद्यालयाचे जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केले.रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यूविद्याविहार येथे रेल्वे रूळ ओलांडताना ज्योती वर्मा या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी ११ वाजेच्या सुमारास ज्योती रेल्वे रूळ ओलांडत असताना अज्ञात धिम्या मार्गावरील लोकलचा अंदाज न आल्याने धावत्या लोकलखाली गेली. रेल्वे रुळावरील बेशुद्धावस्थेत ज्योतीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्योतीला मयत झाल्याचे घोषित केले, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली.
सव्वा तास जखमी रेल्वे रुळांवर उपचाराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:43 AM