मुंबई : नऊवारी साड्या, सदरेकुर्ते, लक्षवेधी रांगोळ्या, प्रतीकात्मक मूर्ती, ढोलताशा, लेजीम आणि फडकणारा भगवा झेंडा; असा काहीसा माहोल सध्या मुंबईत साकारला जात आहे. निमित्त आहे ते गुढीपाडव्याचे. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची तयारी अंतिम टप्प्यात असून लोकांची लगबग सुरू आहे. पताका लावणे, झेंडे सजवणे, मूर्ती सजवणे अशा कामांमध्ये मुंबईकर व्यस्त आहेत. गिरगाव, लालबाग, परळ, दादर, प्रभादेवी, कुर्ला, मुलुंड, माझगाव, मानखुर्दमध्ये मुंबईकरांची लगबग सुरू आहे.प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावर राज्य सरकार आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलेला ‘शिवराज्याभिषेक चित्ररथ’ गुढीपाडव्याच्या दिवशी गिरगावकरांसह मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहे. गिरगाव येथील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वागतयात्रेमध्ये हा चित्ररथ दाखविण्यात येणार आहे. गिरगाव आणि गुढीपाडवा स्वागतयात्रांचे वेगळे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकर पाहत आहेत. प्रतिष्ठानने यंदा शोभायात्रेसाठी ‘अविस्मरणीय अनुभुतींची, भ्रमंती महाराष्टÑाची’ ही संकल्पना ठेवली आहे. त्याअंतर्गत स्वागतयात्रेमध्ये ‘त्रिमूर्ती घारापुरी लेण्यांची’ प्रतिकृती पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या शोभायात्रेमध्ये शिवराज्याभिषेकाच्या चित्ररथाची संकल्पना तयार करणारे प्रा. नरेंद्र विचारे सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.गोराईमध्येही होणार नववर्षाचा जल्लोष : बोरीवली येथील गोराई परिसरामध्येही नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही प्रायोजकत्व न घेता स्वयम् युवा प्रतिष्ठान आणि आम्ही मावळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सलग ९व्या वर्षी ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. या शोभायात्रेत सर्व तरुणाई व नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार असून शोभायात्रेदरम्यान विविध सामाजिक संदेशही देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ध्वजपथक आणि ढोलपथक यांचे एकत्रित सादरीकरण या शोभायात्रेचे विशेष आकर्षण असेल. रविवारी स. ७.३० वाजता साईमंदिर (गोराई खाडी) येथून सुरु होणाऱ्या शोभायात्रेची सांगता प्रगती विद्यालयच्या मैदानामध्ये होईल.>१ हजार २०० वादक, २५ फूट उंच मूर्तीशोभायात्रेमध्ये २० फूट उंच समर्थ रामदास स्वामी यांची इकोफ्रेंडली मूर्ती, २५ फूट उंच भगवान परशुराम यांची प्रतिकृती, १ हजार २०० तरुण-तरुणींंच्या ढोलताशा पथकाचा आविष्कार, खंडोबारायाचा चित्ररथ, प्राचीन युद्धकलेची, मल्लखांबाची प्रात्यक्षिके आणि आॅगस्ट क्रांती मैदान, महालक्ष्मी मंदिर, स्वराज्यभूमी, बाणगंगा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र, उत्तुंग डोंगररांगा, लेणी - शिल्पे अशी रथचित्रे पाहावयास मिळतील.>कशी असेल शोभायात्रा?सकाळी ८ वाजता फडके श्री गणेश मंदिर येथे गणेशपूजन करून स्वागत यात्रा प्रारंभ, १० वाजता गिरगाव नाका येथे गिरगाव ध्वज पथकाचे सादरीकरण, १२ वाजता ठाकूरद्वार नाका येथे संकल्प सभा, ईशान्य भारतात भाजपाला विजय मिळवूण देणारे सुनील देवधर यांचे संबोधन. दुपारी १ वाजता श्यामलदास गांधी मार्गावर (प्रिन्सेस स्ट्रीट) श्री सिद्धिविनायकाची महाआरती आणि समारोप.
नववर्षारंभी मुंबापुरी शोभायात्रांनी दुमदुमणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:26 AM