एमबीबीएस प्रवेशासाठी वीस लाख रुपयांचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 02:14 AM2019-01-16T02:14:16+5:302019-01-16T02:14:30+5:30
कुरार पोलिसांची कारवाई : पसार झांलेल्या ठकाला अटक
मुंबई : मुलीला एमबीबीएससाठी मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवत २० लाख रुपये घेऊन प्रदीपकुमार जे. सिंग हा इसम पसार झाला होता. या प्रकरणी शिताफीने तपास करत दिल्लीतून शनिवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कुरार परिसरात इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना चालविणारे सूरज गुप्ता (नावात बदल) हे मूळचे पटनाचे राहणारे असून, २०१४ साली त्यांची सिंग याच्याशी ओळख झाली. गुप्ता यांच्या मुलीला एमबीबीएससाठी चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता. तेव्हा मोठमोठ्या महाविद्यालयात ओळख असल्याचे सिंग याने गुप्ता यांना सांगितले. त्याचे बोलणे खरे वाटून मुलीला प्रवेश मिळावा, म्हणून २० लाख रुपये त्यांनी सिंगला दिले.
दरम्यान, रांचीच्या राजेंद्र प्रसाद महाविद्यालयात तिला प्रवेश मिळण्याचे नक्की झाल्याचे एक पत्रदेखील सिंगने गुप्ता यांना दिले. मात्र, वर्ष झाले, तरी गुप्ता यांच्या मुलीचे काम झाले नाही. त्यानंतर, जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात तिला प्रवेश मिळवून देण्याचे सांगू लागला आणि पटनातील घरातून अचानक पैसे घेऊन गायब झाला. त्याचा शोध गुप्ता यांनी घेतला. मात्र, तो त्यांना कुठेच सापडला नाही. तेव्हा शेवटी त्यांनी या प्रकरणी जुलै,२०१८ मध्ये कुरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. कुरारचे सहायक पोलीस निरीक्षक नाईक यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी देण्यात आले. त्यानुसार, तांत्रिक तपास, तसेच काही माहितीच्या आधारे सिंग हा दिल्लीत असल्याची माहिती नाईक यांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यांच्या पथकाने दिल्लीतून सिंगच्या मुसक्या आवळल्या. त्याने पटनामध्ये एकाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडूनही असेच पैसे उकळले होते. या प्रकरणी पटना पोलीस चौकशी करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने तक्रार
जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात तिला प्रवेश मिळवून देण्याचे सांगू लागला आणि पटनातील घरातून अचानक पैसे घेऊन गायब झाला. त्याचा शोध गुप्ता यांनी घेतला. मात्र, तो त्यांना कुठेच सापडला नाही. तेव्हा शेवटी त्यांनी या प्रकरणी जुलै,२०१८ मध्ये कुरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. कुरारचे सहायक पोलीस निरीक्षक नाईक यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यांच्या पथकाने दिल्लीतून सिंगला अटक केली़