Join us

शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारातील बाधित ८४२ वृक्षांचे मरण तूर्तास टळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 7:14 AM

कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी बाजूच्याच मोकळ्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

मुंबई - कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी बाजूच्याच मोकळ्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पात बाधित ८४२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. आरे कॉलनीतील २६०० वृक्ष छाटणीच्या प्रस्तावानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याचा हा पहिलाच प्रस्ताव होता. प्रत्यक्षात ही झाडे इमारत बांधण्यात येणाऱ्या जागेवर नसल्यामुळे तोडण्यात येऊ नयेत, असे मत सदस्यांनी मांडले. त्यानंतर हा प्रस्ताव नाकारून (दप्तरी दाखल) सुधारित माहिती प्राधिकरणापुढे आणण्याची सूचना सदस्यांनी केली.उपनगरातील अद्ययावत शताब्दी रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या जागेवर या रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र या जागेवर असलेल्या ८४२ झाडांपैकी १४९ झाडे तोडण्यात येणार असून ६९३ झाडांचे पुन्हा रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये पिंपळ, वड, नारळ, आंबा आणि फणसाच्या झाडांचा समावेश आहे. ही झाडे तोडण्यासाठी उद्यान विभागाने मार्च महिन्यात सार्वजनिक नोटीसद्वारे सूचना व हरकती मागविल्या होत्या. मात्र त्या वेळेस न्यायालयाकडून स्थगिती आदेश असल्याने हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला.शताब्दी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून आलेल्या या प्रस्तावावर वृक्ष प्राधिकरणात बुधवारी चर्चा करण्यात आली. भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत आणि अलका केरकर यांनी शताब्दी रुग्णालय व प्रस्तावित इमारतीच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर संबंधित प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत त्या जागेची पुन्हा पाहणी करण्याची सूचना केली. इमारत बांधण्यात येणारी जागा मोकळी असून या परिसरात असलेली इतर झाडे प्रकल्पाच्या आड येत नसल्याचे त्यांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव अखेर दप्तरी दाखल करण्यात आला.६० टक्के झाडे मृतावस्थेतगोरेगाव पूर्व, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्पांतर्गत २६०० झाडे तोडण्यात आली. या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरणात जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदिवली येथे झाडे तोडण्याचा हा पहिलाच प्रस्ताव आहे. रुग्णालयाच्या इमारतीसाठी त्या जागेवर असलेल्या ८४२ झाडांपैकी १४९ झाडे तोडण्यात येणार असून ६९३ झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. आरे कॉलनीत पुनर्रोपण केलेल्या झाडांमध्ये ६० टक्के झाडे मृतावस्थेत असल्याचे नुकतेच एका पाहणीत आढळून आले आहे.

टॅग्स :मुंबई