पनवेलमधील वीस गावे दत्तक
By admin | Published: November 18, 2014 11:00 PM2014-11-18T23:00:43+5:302014-11-18T23:00:43+5:30
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रशांत शेडगे, पनवेल
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पनवेलमध्ये खासदार, आमदार सोडा तर चक्क पंचायत समिती सदस्यांनी प्रत्येक एक गाव दत्तक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यामुळे एकूण वीस गावांना खऱ्या अर्थाने पालक मिळाला असून हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल परिसरातील नागरीकरणाच्या कक्षा रुंदावत असल्या तरी ग्रामीण भाग तालुक्यात आहे. शहरात पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुरवल्या जातात. मात्र अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामध्ये दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांचाही समावेश असून त्या ठिकाणी सुविधा पुरवण्यास अनेक अडचणी येतात. त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असणारा अपुरा निधी व मनुष्यबळाचा अभाव त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. परिणामी विकासाचा प्रादेशिक समतोल साधता येत नाही. त्याचबरोबर ग्रामीण जनतेला न्यायहक्क मिळत नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याची ओरड चालली आहे. याठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा पुरवल्या तर विद्यार्थी संख्येमध्ये घट होणार नाहीच त्याचबरोबर ते इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करतील म्हणून प्रत्येक पंचायत समिती सदस्यांनी एक शाळा दत्तक घ्यावी, अशी संकल्पना नीलेश पाटील यांनी सुरुवातीला मांडली होती. शिवकर येथील शाळा दत्तक घेऊन स्वत:पासून त्यांनी सुरुवात केली. खासदार, आमदारच काय तर पंचायत समिती सदस्यसुद्धा हे काम करू शकत असल्याने या विषयावर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीत एकूण वीस सदस्य असून सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होण्याचे ठरवले आहे. काहींनी तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामी गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील व विश्वास म्हात्रे यांच्याकडून सदस्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.