सीए परीक्षेत मुंबईच्या जुळ्या बहिणी चमकल्या; श्रुती, संस्कृती पारोलिया पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:35 AM2024-01-10T08:35:49+5:302024-01-10T08:38:10+5:30

मुंबईची संस्कृती पारोलिया देशात दुसरी, मधुर जैन देशात पहिला

Twin sisters from Mumbai shine in CA exams; Shruti, Sanskriti Parolia succeeds in the first attempt | सीए परीक्षेत मुंबईच्या जुळ्या बहिणी चमकल्या; श्रुती, संस्कृती पारोलिया पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

सीए परीक्षेत मुंबईच्या जुळ्या बहिणी चमकल्या; श्रुती, संस्कृती पारोलिया पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत मुंबईच्या संस्कृती पारोलिया हिने देशात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे. महत्त्वाचे म्हणजे संस्कृतीची जुळी बहीण श्रुती हिनेही सीएच्या परीक्षेत आठवा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे कांदिवलीतील पारोलिया कुटुंब सध्या या दुहेरी यशाचा आनंद साजरा करत आहे.

दोघींनीही पहिल्याच प्रयत्नात सीए होण्याची कामगिरी केली आहे. इंटरमिजिएट परीक्षेतही संस्कृती देशात तिसरी होती. तर श्रुतीने चौथा क्रमांक पटकावला होता. दोघी बहिणी बरेचदा एकत्रच अभ्यास करतात. वडील आणि मोठ्या भावाकडून त्यांना कायम अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आम्हाला लहानपणापासून अंकांचे खेळ आवडत. तसेच, आम्ही एकत्र अभ्यास करतो, असे संस्कृतीने सांगितले. संस्कृती अकरावीतही कॉलेजमध्ये पहिली आली होती. तर श्रुतीने बारावीत पहिले येण्याचा मान मिळवला होता.

मधुर जैन याने सीए अंतिम परीक्षेत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईची संस्कृती पारोलिया हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच, मुंबईच्याचा जय देवांग जिमुलिया याने सीए इंटरमिजिएटमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मधूर जैन ६१९ गुण मिळवत पहिला, तर संस्कृती पारोलिया हिला ५९९ गुण मिळाले आहेत. इंटरमिजिएटमध्ये मुंबईच्या जय जिमुलियाने ६९१ गुणांसह पहिले स्थान मिळविले. त्याची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ८६.३८ टक्के आहे. अहमदाबादचा भगेरिया तनय आणि सुरतचा ऋषी मेवावाला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा आला.

प्रत्येक विषयात ४० टक्के गुण आणि एकूण परीक्षेत ५० टक्के गुण मिळवलेले उमेदवार अनुक्रमे सीए फायनल, सीए इंटरमिजिएट परीक्षेत पात्र ठरतील, असे ‘आयसीएआय’चे धीरज खंडेलवाल यांनी सांगितले.

Web Title: Twin sisters from Mumbai shine in CA exams; Shruti, Sanskriti Parolia succeeds in the first attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.