मुंबई- अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एका कार्यक्रमात पुरूष राजकीय नेत्यांना एक दिवस सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचं चॅलेंज दिलं आहे. मासिक पाळी संदर्भातील आयोजीत एका कार्यक्रमात ट्विंकल खन्नाने हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात मासिक पाळीसंदर्भात समाजात असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच सॅनिटरी नॅपकिनच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. पॅडमॅन अशी ओळख असणारे अरूणाचलम मुरूगंथमही या कार्यक्रमात हजर होते. ट्विंकल खन्ना व मुरूगंथन यांनी सॅनिटरी नॅपकिन्सच्या मुद्द्यावर त्यांची मत मांडली.
मासिक पाळीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी महिलांना सामान्य वागणूक दिली जात नाही, असं ट्विंकलने या कार्यक्रमात म्हटलं. सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेल्या जीएसटीलाही ट्विंकलने जोरदार विरोध केला. याचदरम्यान, ट्विंकलने पुरूष राजकीय नेत्यांना एक दिवसासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचं आव्हान दिलं. पुरष राजकीय नेत्यांनी फक्त एका दिवसासाठी सॅनिटरी नॅपकिनचा प्रयोग केला तर सॅनिटरी पॅड प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतील, असं मत अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मांडलं. सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेत असल्याच्या निर्णयाला सगळीकडून विरोध केला जातो आहे. पॅडवरचा जीएसटी हटवला तर जास्तीत जास्त महिला मासिकपाळीच्या दरम्यान त्याचा वापर करू शकतील, यासाठीच हा विरोध केला जातो आहे.
सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या अरूणाचलम मुरूगंथम यांनी एक मशीन विकसीत केली आहे. या मशीनच्या मदतीने तयार होणाऱ्या पॅडची किंमत इतर कंपनीच्या पॅड्सच्या तुलनेत कमी असणं शक्य आहे. पद्म पुरस्कार विजेते मुरूगंथम यांनी या कार्यक्रमात सांगितलं की, मसिकपाळीच्या वेळी महिलांना येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेण्यासाठी मी काही दिवस सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला. सगळ्या अडचणींची जाणीव झाल्यानंतर महिलांसाठी कमी किंमतीत मिळाणारे सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं.