अंगडिया वसुली प्रकरणात ट्विस्ट, साक्षीदारांनी आरोपीना ओळखलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:39 PM2022-04-22T13:39:26+5:302022-04-22T13:40:41+5:30
त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती.
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने तीन पोलिसांच्या विरोधात एक हजारपेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, ओळख परेडदरम्यान साक्षीदारांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांना ओळखले नसल्याची माहिती आहे. त्याचवेळी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी अजूनही गायबच आहेत.
त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यावसायिकांना अटकाव केला आणि खंडणी उकळली, असा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार, गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
याशिवाय प्रकरणातील अंगडिया व्यावसायिकांचे जबाब महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. तसेच, जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुराव्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.