ट्विटरला केवळ पाश्चिमात्य देशांतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रिय आहे - आपचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:20+5:302021-02-05T05:49:51+5:30
मुंबई : ट्विटर इंडियाने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी स्थगित केले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा ...
मुंबई : ट्विटर इंडियाने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी स्थगित केले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
आपच्या मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन आणि महाराष्ट्राचे सचिव धनंजय शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट स्थगित करण्यात आले आहे. तसेच प्रीती शर्मा मेनन यांना ट्विटरने कायदेशीर नोटीस पाठवली असून, सरकारच्या कायदेशीर विनंतीवरून ट्विटर अकाऊंट स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या ट्विटरने कोणत्या सरकारच्या आदेश अथवा विनंतीनुसार ही कारवाई केली, याची माहिती देण्यास नकार दिल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. सरकारच्या सांगण्यानुसार राजकीय विरोधकांची अकाऊंट अडकवून ठेवणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सनदशीर मार्गाने राजकीय विरोध प्रकट करण्याच्या अधिकारांवर आणलेली गदा आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक असल्याची प्रतिमा निर्माण करणाऱ्या ट्विटरची भारतातील वर्तणूक मात्र भेदभावाची व राजकीय दबावाखाली काम करण्याची आहे. ट्विटर इंडियाने आप नेत्यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी पक्षाने केली आहे.