Join us

मुंबईचा खेळाडू मागत राहिला रिव्ह्यू; MS धोनीने मात्र बाहेरची धरली वाट, मग..., पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 9:56 AM

CSK Vs MI: चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले. 

चेन्नई सुपरकिंग्जकडून पहिल्यांदाच आयपीएल सामना खेळलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या 'घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. त्याची स्फोटक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची दमदार फिरकी या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले. 

चेन्नईने मुंबईला २० षटकांत ८ बाद १५७ धावांत रोखले. यानंतर चेन्नईने १८.१ षटकांत बाजी मारताना ३ बाद १५९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात जेसन बेहरेनडॉर्फने डीवोन कॉन्वेला त्रिफळाचीत करत चेन्नईला धक्का दिला. मात्र, यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या अजिंक्यने निकाल स्पष्ट करत केवळ १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या फटकेबाजीपुढे मुंबईकरांनी जणू हार मानली. रहाणेने ऋतुराज गायकवाडसह दुसऱ्या गड्यासाठी ४४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली.

डीआरएस म्हणजे 'धोनी रिव्ह्यू सिस्टिम' असल्याचे महेंद्रसिंग धोनीच्या अचूक निर्णयामुळे पुन्हा एकदा दिसून आले. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सँटनरला स्वीप फटका मारण्याचा सूर्यकुमारचा अंदाज चुकला आणि चेंडू धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. चेन्नईने झेलबादचे अपील केल्यानंतर पंचांनी वाईड बॉलचा निर्णय दिला. यावर धोनीने लगेच डीआरएस मागितला आणि रिप्लेमध्ये चेंडू सूर्याच्या बॅटला लागून गेल्याचे स्पष्ट झाले. 

मुंबईचा फलंदाज हृतिक शोकीन डावातील शेवटचा चेंडू खेळत होता. ड्वेन प्रिटोरियसने शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला मोठा फटका बसू नये म्हणून गोलंदाजाने जाणीवपूर्वक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. हृतिक हा चेंडू खेळू शकला नाही. चेंडू खेळताना चुकताच त्याने अंपायरकडे पाहिले आणि चेंडू वाईड देण्याचे आवाहन केले. अंपायरने वाईड दिले नाही. त्यानंतर फलंदाज हृतिकने वाइडसाठी रिव्ह्यू घेतला. पण धोनीने जबरदस्त आत्मविश्वास दाखवला आणि षटक संपल्यावर त्याने सर्व खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स