मुंबई : मूळ गावी परतण्याची मागणी करीत परप्रांतीय मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर गलका केला. मात्र याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये वांद्रे येथील घटनेनंतर टिष्ट्वटर युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे यांच्यावर खापर फोडत राजीनाम्याची मागणी टिष्ट्वटरवर ट्रेंड करण्यात आली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपविरोधी गोटातून उद्धव हे जगातील बेस्ट मुख्यमंत्री असल्याचा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला.
काल रात्रीपासूनच उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागणारे मेसेज सोशल मीडियावर पडू लागले. वांद्रे येथील उद्रेकानंतर कोरोनाची एकूण परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री ठाकरे अपयशी ठरल्याचा आरोप या ट्रेंडमध्ये करण्यात आला. कोरोनासाठी राज्य सरकारने केलेल्या घोषणा आणि त्यातील विसंगती यात मांडल्या जात आहेत. याला प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे जगातील बेस्ट सीएम असल्याचा हॅशटॅग शिवसेनेसह भाजप विरोधकांकडून चालविला जात आहे. उद्धव ठाकरे शांत, संयमी आहेत. त्यांचे नेतृत्व आश्वासक आहे. या संकटाच्या काळात ते स्थिरचित्ताने कामकाज करीत असल्याचा दावा या हॅशटॅगमधून केला जात आहे. ना खोटी आश्वासने, वास्तववादी आणि खरा नेता अशी ठाकरे यांची स्तुती करण्यात आली. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांसोबत आहे. त्यांच्यावर जळणारे जळत राहतील. त्या उजेडातच चालत राहू आणि आमची कमाल दाखवू, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल काढण्यात आले.