लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील गांजाची शेती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) कारवाई करत उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत ५ कोटी ६३ लाख किंमतीचे २ हजार ८१६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
एएनसीच्या वांद्रे कक्षाने ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी अवैधपणे गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४७ किलो ग्रॅम वजनाचा 'गांजा' जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करत तपास सुरू करण्यात आला. आरोपीच्या चौकशीत धुळ्यातील आरोपीकडून गांजा घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हे शाखेने धुळ्यात मोर्चा वळवला. तेव्हा, किरण कोळी नावाच्या आरोपीने येथे गांजाची लागवड केल्याचे समोर आले.
कोळी याने धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात दोन एकरमध्ये शेतीची लागवड केल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हे शाखेने येथील शेत उद्ध्वस्त करत २७७४ किलो वजनाच्या गांजाची झाडे तसेच ४२ किलो वजनाचा सुका गांजा असा एकूण २८१६ किलो वजनाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.