मुंबई : चोराने केलेल्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या सैफ अली खानला गुरुवारी पहाटे वांद्र्यातील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्याबरोबर मुलगा तैमूर होता. सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. तसेच शरीरावर सहा जखमा होत्या. सैफला तातडीने अतितात्काळ विभागात हलविण्यात आले. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यात आला. सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती स्थिर असून उपचाराला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यांना कधी डिस्चार्ज द्यायचा हे डॉक्टर ठरवतील.
रुग्णालयातील घटनाक्रमपहाटे सव्वातीनच्या सुमारास अतितात्काळ विभागात सैफला दाखल. तपासणीमध्ये त्याच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकल्याचे आढळले. डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखम. मानेच्या उजव्या बाजूला झालेल्या हल्ल्यामुळे रक्तस्त्राव सुरू. न्यूरोसर्जन नितीन डांगे, प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या पथकाकडून उपचार सुरु. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉ. डांगे यांनी चाकूचा तुकडा काढला. सैफला हृदयविकाराचा त्रास असल्याने हृदयविकार तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित. प्लास्टिक सर्जन डॉ. जैन यांनी सैफच्या डाव्या हातावर आणि मानेवर दोन तास शस्त्रक्रिया केल्या. सकाळी १०.३० वाजता सैफला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. घटना घडली तेव्हा मध्यरात्री पार्टीवरून परतलेल्या करिनाने घरात शिरलेल्या या चोरास पाहिले. घाबरून ती ओरडली. ते ऐकून मुलांच्या खोलीत झोपलेली मोलकरीण बाहेर आली. तिच्यावर आरोपीने हल्ला केला. तिला वाचविताना सैफही गंभीर जखमी झाला.
- सैफ यांच्या मणक्यातून द्रव स्त्रवत होता. शस्त्रक्रियेने चाकू काढला व मणक्यातून येणारा द्रव थांबविण्यात आला. वेळीच शस्त्रक्रिया केली नसती तर मणक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा परिणाम पायांच्या हालचालीवर झाला असता. डॉ. नितीन डांगे, न्यूरोसर्जन