Join us  

फेरीवाले अडीच लाख, सर्वेक्षण फक्त ३२ हजार जणांचे, टाउन व्हेंडिंग समितीची निवडणूक वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 3:52 PM

मुंबईतील अडीच लाखांपैकी फक्त ३२ हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे.

मुंबई :

मुंबईतील अडीच लाखांपैकी फक्त ३२ हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे. असे असतानाही नगर पथविक्रेता (टाउन व्हेंडिंग) समिती नेमण्यासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे उर्वरित फेरीवाल्यांच्या व्यवसायावर बंदी येणार असल्याने मुंबई हॉकर्स युनियनने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ३ मे २०२३ रोजी टाउन व्हेंडिंग समितीची एक बैठक झाली होती. त्यात २०१४च्या सर्वेक्षणानुसार पालिकेने २२ हजार, तर यापूर्वी पात्र ठरविलेल्या १० हजार, अशा एकूण ३२ हजार परवानाधारक फेरीवाल्यांना पात्र मानून यादीत समाविष्ट करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार आहे. पण, या निर्णयाला मुंबई हॉकर्स युनियनने विरोध केला आहे. ३२ हजार फेरीवाल्यांची यादी मंजूर झाल्यास अडीच लाखांहून अधिक फेरीवाल्यांचे हक्क आणि स्वयंरोजगार हिरावून घेऊन त्यांच्या व्यवसायावर बंदी येणार आहे.  तसेच फेरीवाला कायद्यांतर्गत सर्वेक्षणानंतरच पुढील कारवाई करावी, अशी भूमिका मुंबई हॉकर्स युनियनने घेतली आहे.

मुंबई महापालिकेने सर्व नियमांचे उल्लंघन करून जाहीर केलेली ३२ हजार पात्र फेरीवाल्यांची यादी मुंबई हॉकर्स युनियनला मान्य नाही. त्यामुळे युनियनने टाऊन व्हेंडिंग कमिटी निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.    - शशांक राव, प्रमुख, मुंबई हॉकर्स युनियन

प्रमुख मागण्या  केवळ ३२ हजार फेरीवाल्यांनाच पात्र ठरवण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा. सर्व फेरीवाल्यांचे सध्याच्या टाउन व्हेंडिंग समितीने फेरसर्वेक्षण करावे. फेरीवाल्याला त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याचा परवाना देण्यात यावा.

टॅग्स :फेरीवालेमुंबई