अडीच लाख उत्पन्नाची अट, पैसे थेट बँक खात्यात! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तुम्ही आहात का पात्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 10:45 AM2024-06-30T10:45:25+5:302024-06-30T10:45:37+5:30
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा या योजनेच्या अंमलबजावणीचा जीआरही जारी करण्यात आला. या योजनेनुसार महिलांना महिन्याला १,५०० हजार रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून त्याची अंमलबजावणी जुलैपासूनच करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरू शकतील यासंदर्भातील माहिती या जीआरमध्ये देण्यात
आली आहे.
योजनेचा लाभ कोणाला?
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला.
- योजनेचा लाभ वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळेल.
- योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेत आहेत, अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १,५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे, अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, तसेच चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत अशा कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.