बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाची मुलगी ठार ! आरेतील घटना, स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण
By गौरी टेंबकर | Published: October 24, 2022 03:10 PM2022-10-24T15:10:35+5:302022-10-24T15:11:06+5:30
वनविभाग आणि आरे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अडीच वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग आणि आरे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
मयत मुलगी ही मूळची राजस्थानची राहणारी असुन तिचे नाव इकिता अखिलेश लोट (२.५) आहे. ती आरे च्या युनिट क्रमांक १५ मध्ये कुटुंबासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडे सहा ते पाऊण सातच्या सुमारास ही चिमुरडी घराबाहेर उभी होती. त्यात दरम्यान बिबट्याने तिच्यावर झडप मारली आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर बिबट्या जंगलात पळून गेला. मुलगी अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.
याची माहिती स्थानीकांना मिळताच त्यांनी आरे पोलीस यांना कळवले. त्यानुसार आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी त्यांच्या पत्रासह घटना सही धाव घेत मुलीला स्थानिकांच्या मदतीने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरने तिला तपासून मयत घोषित केले त्यानुसार तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत वनविभागालाही याची माहिती दिली आहे. ऐन दिवाळीच्या सणात लोट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा सानिकांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"