Join us

हेल्मेटसक्तीमुळे अडीच कोटींची दंडवसुली

By admin | Published: February 12, 2016 3:23 AM

परिवहन विभागाने हेल्मेटसक्तीचे आदेश दिल्यानंतर राज्यभर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. मुंबईतदेखील पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत २६ दिवसांत तब्बल अडीच कोटींची

- मनीषा म्हात्रे,  मुंबईपरिवहन विभागाने हेल्मेटसक्तीचे आदेश दिल्यानंतर राज्यभर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. मुंबईतदेखील पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत २६ दिवसांत तब्बल अडीच कोटींची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तटस्थ भूमिका घेत गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या पत्नीकडूनही दंड वसूल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने हेल्मेटसक्तीचे आदेश काढले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. पुण्यात काहींनी या सक्तीला पहिल्यांदा विरोध दर्शवला. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नवीन वादास तोंड फुटले.मुंबईत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या पत्नीकडूनही दंड आकारण्यात आला. कुलकर्णी यांच्या पत्नी नीलांबरी दुचाकीवरुन भाजी मार्केटमधून घरी परतत होत्या. तथापि, हेल्मेट सोबत असूनही डोक्यात न घातल्याने वरळी येथे नाकाबंदी दरम्यान त्यांना अडविले. आपण कुलकर्णी यांच्या पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी कुलकर्णी यांना फोन केला. हेल्मेट सोबत असूनही हेल्मेट न घातल्याने कुलकर्णी यांनी पत्नीस दंड भरण्यास सांगितले. त्यामुळे नीलांबरी यांना १०० रुपयांचा दंड भरून काढता पाय घ्यावा लागला.मुंबई पोलिसांनी १६ जानेवारीपासून सुरू केलेल्या कारवाई सत्रामुळे दुचाकीस्वारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. गर्दीची ठिकाणे, द्रुतगती मार्गे, एलबीएस रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, जकात नाका, चेकनाका अशा ठिकाणी मुंबई पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांच्या मुसक्या आवळल्या. १० फेब्रुवारीपर्यंत अवघ्या २६ दिवसांत २ लाख ४३ हजार ४०५ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल २ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण उपनगरातून २४ हजार ९८४ , मध्य उपनगरातून ४८ हजार ९०, पूर्व उपनगर ३७ हजार ५०८, पश्चिम उपनगर २७ हजार ९७८ आणि उत्तर उपनगरातून ४५ हजार ७६९ कारवाई करण्यात आली. यामध्ये मध्य आणि उत्तर विभागातून सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूक शाखेकडून ५९ हजार ७६ कारवायांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून याबाबत जनजागृतीचा विडा उचलला होता. हेल्मेटसक्ती नसून तुमचा अनमोल जीव वाचविण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे. सर्वांना समान नियम असून प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करा. - धनंजय कुलकर्णी, पोलीस प्रवक्ते मुंबई (पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा)