चौकडीला अटक : सायबर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रधानमंत्री कर्ज योजनेतून कर्ज देण्याच्या नावाखाली देशभरात अडीच लाख नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. यात, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
संजीव कुमार सिंह (वय ३६), प्रांजुल राठोड (२७), रामनिवास मूलचंद कुमावत (२५), विवेक दिनेश बाबू शर्मा (४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात ठगांनी बनावट ओळखपत्रांच्या आधारे ८ ॲप तयार केले. यात पी. एम. व्हाय. एल. योजना, पी. एम. भारत कर्ज योजना, प्रधानमंत्री कर्ज योजना, सर्वोत्तम फायनान्स, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज, भारत योजना कर्ज, मुद्रा कर्ज, कृष्णा कर्ज नावाच्या ॲपचा समावेश आहे. हे ॲप खरे समजून २ लाख ७९ हजार ३५२ जणांनी यावर नोंदणी केली. त्यात प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ठगांनी ४ कोटी रुपये उकळले आहेत. त्यांच्याकडून १८ मोबाईल, १० हार्डडिस्क, ३ राऊटर, १ पेन ड्राइव्ह जप्त केला आहे.