Join us

अडीच कोटींचे दागिने लुटणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2015 2:18 AM

कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्याजवळील अडीच कोटींच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे

मुंबई : कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्याजवळील अडीच कोटींच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार लुटारूंना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याजवळून २ कोटी १० लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. राहुल कन्याळकर, आशिष भोसले, नसीम बैतुल्ला खान आणि सचिन कणसे अशी अटक आरोपींची नावे आहेत.सांताक्रुझ विमानतळावर जेट कार्गोमधून आणलेल्या २ कोटी ४८ लाख रुपये किमतीचे दागिने मालकापर्यंत पोच करण्याचे काम जय मातादी कुरियर कंपनीने घेतले होते. त्यानुसार कंपनीचा कर्मचारी महेंद्रकुमार सैनी (२३) हा २१ तारखेला मोटारसायकलवरून हे दागिने घेऊन निघाला. विलेपार्ले येथील एन.पी. ठक्कर मार्गावरून जात असलेल्या सैनीला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी अडविले. चौकशीसाठी नेत असल्याचे सांगून त्याचे अपहरण करून त्याच्याकडील बॅग हिसकावून आरोपी पसार झाले. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त छेरिंग दोरजे, पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश गवणे, अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रक्षा महाराव, पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्यासह ५० जणांच्या पथकाने तपास सुरू केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरियर कंपनीमध्ये काम करणाऱ्या नंदू टेलरने अशा प्रकारे विनासुरक्षा करोडो रुपयांच्या दागिन्यांची ने-आण केली जात असल्याची माहिती त्याचा मित्र सराफ हिंमत टेलरला दिली. हिंमतने त्याचा कंत्राटदार मित्र खानच्या मदतीने दागिन्यांच्या लुटीची योजना तयार केली. त्यासाठी खानने सराईत गुन्हेगार राहुल कन्याळकर आणि आशिष भोसलेला याबाबत सांगितले. दोघांवरही तब्बल १५हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्ह्यानंतर पळून जाण्यासाठी स्विफ्ट डिझायर कारचा मालक असलेल्या सचिन कणसे आणि अंबरनाथमध्ये राहणारा दीपक या दोघांना कटात सहभागी करून घेण्यात आले. गेल्या दोन आठवड्यांपासून या आरोपींनी या ठिकाणाची रेकी केली होती. लुटीच्या दिवशी दीपक आणि सचिनने नंदूने केलेल्या इशाऱ्यावरून सैनीचे अपहरण करून दागिन्यांची बॅग पळवली. खानने हिंमत आणि नंदूला काही सोन्याचे दागिने आणि बिस्किटे देऊन खर्चासाठी ९ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर हिंमत आणि नंदूने फोन उचलणे बंद केल्याने आरोपींनी सर्व ऐवज ठाण्यातील एका मित्राकडे ठेवला. नाशिक आळेफाटा परिसरातून चौघेही एसटीतून जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या चौघांना गजाआड केले. (प्रतिनिधी)