अडीच महिन्यांत १० हजार पोलिसांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:04+5:302021-04-23T04:07:04+5:30
६० जणांचा मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा वाढत असताना त्याविरुद्ध लढत असलेले ...
६० जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा वाढत असताना त्याविरुद्ध लढत असलेले खाकी वर्दीवालेही त्यामध्ये सापडत आहेत. गेल्या अवघ्या अडीच महिन्यात राज्य पोलीस दलातील तब्बल १० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६० अधिकारी-अंमलदाराना प्राण गमवावे लागले आहेत.
या कालावधीत सक्रिय काेराेनाबाधित पोलिसांचे प्रमाण तब्बल १३ पटीने वाढले आहे. यावर्षी १ फेब्रुवारीला कोरोनाचे केवळ ३१२ रुग्ण होते. आजअखेर हा आकडा ३,८७४ इतका वाढला आहे. पाेलिसांमध्ये झपाट्याने काेराेना संसर्ग पसरत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
कोविड-१९ संसर्गाचा सामना करताना गेल्या वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील पोलीस फ्रंटलाईनवर लढत आहेत. त्यांनाही त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
* अशी झाली काेराेनाची लागण
- गेल्या ८२ दिवसांत मुंबईसह राज्यभरातील सुमारे १० हजार पोलिसांना या विषाणूची लागण झाली.
- १ फेब्रुवारी २०२१ राेजी पोलीस दलात एकूण २९ हजार ५९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २८ हजार ९३७ पूर्णपणे बरे झाले. ३३०जणांचा मृत्यू झाला होता तर अवघे ३१२ सक्रिय रुग्ण होते.
- मात्र २२ एप्रिलअखेरपर्यंत हा आलेख झपाट्याने वाढत गेला. एकूण ३८ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एकूण ३४,७३५ जण बरे झाले असून एकूण मृत्यूची संख्या ३०० पर्यंत वाढली.
- सध्या ३ हजार ८७४ पोलीस राज्यातील विविध आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांतर्गत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
* पुरेपूर दक्षता बाळगावी
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले असले तरी त्यांना स्वतःच्या सुरक्षेबाबतही पुरेपूर दक्षता बाळण्याची सूचना केली आहे. आजाराचे थोडेही लक्षण दिसल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास तातडीने तपासणी तसेच योग्य काळजी घेण्याबाबत घटकप्रमुखांना कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे.
- संजय पांडे,
पोलीस महासंचालक
........................................