मनोहर कुंभेजकर
मुंबई : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, देशाच्या रक्षणासाठी आपले जवान सीमेवर डोळ्यांत तेल घालून तैनात असतात. यंदा कोरोनामुळे त्यांच्यापर्यंत बहिणींच्या राख्या पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने देशभरातून गोळा केलेल्या ८ हजार राख्या घेऊन दोन तरुण स्कूटीवरून अडीच हजार किमी प्रवास पूर्ण करून सैनिकांपर्यंत पोहोचले.
वैभव जगदीश मांगेला व रोहित वासुदेव आचरेकर अशी या तरुणांची नावे आहेत. वैभव मुंबईच्या जुहू मोरा कोळीवाडा परिसरात राहतो. तर रोहित डोंबिवलीचा रहिवासी आहे. ते दोघे अडीच हजार किमीचा प्रवास स्कूटीवरून करून शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्रीनगरला पोहोचले.वे टू कॉज संस्थेच्या ‘एक बंधन मिशन’ या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातून गोळा केलेल्या ८ हजार राख्या ते सोमवारी श्रीनगरच्या सीमेवर असलेल्या आपल्या जवानांकडे सुपूर्द करणार आहेत.‘तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर सण साजरे करू शकत नाही. तुम्ही आहात म्हणून आम्ही देशातील बहिणी सुखरूप आहोत, आम्ही प्रेमाने दिलेल्या राख्या आपण राखी पौर्णिमेला परिधान करा. आमचे, देशाचे व भारतमातेचे रक्षण करा,’ असा देशभरातील बहिणींचा संदेशही ते जवानांना देणार असल्याची माहिती वैभवने ‘लोकमत’ला दिली.रोज सुमारे ५००किमीचा प्रवासआम्ही दोघे २२ जुलै रोजी मुंबईवरून निघालो. रोज सुमारे ४०० ते ५०० किमीचा प्रवास स्कुटीवरून करत होतो. जम्मू ते श्रीनगर रस्ता कच्चा असल्याने २०० किमीचे अंतर पार करायला आम्हाला चक्क ११ तास लागले. प्रवासात ठिकठिकाणी स्थानिकांकडून आमचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले, असे वैभवने सांगितले.