Join us

अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी तोडले लचके

By admin | Published: March 26, 2015 10:54 PM

नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे.

ठाणे : नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. या घटनेत जबर जखमी झालेल्या मुलावर एका खासगी रु ग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अन्य एक मुलगा जखमी झाला होता. त्यानंतर, ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हमदन मुश्ताक खान असे या मुलाचे नाव आहे. तो शादीमहल, शरिफा रोड येथील नीलकमल इमारतीमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे पाहुणा म्हणून आला होता. गुरुवारी दुपारी तो येथील मोकळ्या जागेत खेळत असताना त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या डोळ्याचा, मानेचा तसेच डोक्याचा चावा घेतला. हा प्रकार तेथून जाणाऱ्या काही नागरिकांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी कुत्र्यांना हुसकावून मुलाला काळसेकर रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, येथील एकॉर्ड कॉम्प्लेक्समध्ये सफाईसाठी येणाऱ्या ठामपा सेवेतील एका सफाई कामगार महिलेवरही दोन वेळा कुत्र्यांनी हल्ला केला आहे. एक महिन्यापूर्वीच मुंब्रा-कौसा भागातील नगरसेवकांनी प्रभाग समिती सभापती मेराज खान यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्या वेळी अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आखली जाईल, असे सांगितले होते. (प्रतिनिधी)