Join us

अडीच वर्षांनंतर शस्त्रक्रिया; २० वर्षीय तरुण पुन्हा चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:55 AM

मुलुंडमधील रुग्णालयात उपचार

मुंबई : साधारणपणे तीन वर्षांपूर्वी येमेनचा रहिवासी असलेल्या २० वर्षीय तौफिकच्या दुचाकीचा अपघात झाला. यात त्याच्या नितंब आणि मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा खुब्याचा सांधा आणि मांडीचे हाड पुन्हा बसविण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याला लंगडतच चालावे लागत होते. काही काळानंतर शस्त्रक्रिया झालेला भाग हलवताना त्याला त्रास होऊ लागला व प्रचंड वेदना होऊ लागल्या. वेदनांमुळे त्याने चालणे पूर्णपणे थांबवले. तो पूर्णवेळ बिछान्याला खिळून असल्याने त्याची शाळाही सुटली. मात्र मुलुंड येथील रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे तो पुन्हा चालणार आहे.मुलुंड रुग्णालयातील हाडरोग विभागाचे संचालक डॉ. कौशल मल्हान यांनी रुग्णाच्या स्थितीचे मूल्यमापन केले. त्यात खुब्याचा सांधा निखळल्याचे व शस्त्रक्रिया केलेला पाय काही इंचांनी आखूड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाय जखडला गेला होता आणि खुब्याच्या सांध्यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने बसवला गेलेला होता. हा सांधा आत वळलेला होता आणि आतल्याआत फिरत होता. स्नायूंनाही मोठी इजा पोहोचलेली होती. मऊ उतींच्या पातळ थराआतून ठळकपणे दिसणाऱ्या ट्रोकॅन्टरवरून हे स्पष्ट दिसत होते. खुब्याचा सांधा खोबणीत म्हणजे सॉकेटमध्ये अडकला होता आणि तो खुब्याच्या परिसरात स्पष्टपणे टेंगळासारखा वर आलेला दिसत होता.रुग्णाला अधिक प्रमाणात चालण्याफिरण्याची मोकळीक मिळेल अशी ड्युएल मोबिलिटी पद्धत आहे. ज्यात कृत्रिम सांध्यामध्ये द्विप्रतलीय किंवा ड्युएल प्लेनर हालचालीला मुभा मिळते. या प्रकारात खुब्यातून होणारी हालचाल दोन वेगवेगळ्या पृष्ठभागांवर विभागली जात असल्याने तांत्रिकदृष्ट्या या सांध्याचा कमी वापर होतो व त्याची अधिक मोकळेपणाने हालचाल होऊ शकते. ड्युएल मोबिलिटी असलेले अनसिमेंटेड हिप समाधानकारकरीत्या आरोपित करण्यात आले व त्याचवेळी पायाची लांबी आणि विरूपता या गोष्टीही दुरुस्त करण्यात आल्या. खुब्याच्या सांध्याला स्थिरता देणाºया स्टॅबिलायझर्सची कार्यक्षमता कमी असल्याने त्यांना आधार देण्यासाठी नितंबाचा एक स्नायू - ग्लुटिअस मॅक्झिमसचा वापर करण्यात आला. एक आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर तौफिकला कोणाच्याही आधाराशिवाय चालणे जमू लागले. पुन्हा शाळेत जाण्याचा निर्धार करूनच तो आपल्या वडिलांसोबत घरी परतला.