मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
By धीरज परब | Updated: March 15, 2025 23:38 IST2025-03-15T23:36:42+5:302025-03-15T23:38:34+5:30
Mumbai Crime news: भानुसे यांची प्रकृती सुधारली असून पोलिसांनी गुप्ता व दिलीप ह्या दोघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली .

मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
-धीरज परब, मीरारोड
धुलिवंदनच्या (१४ मार्च) सायंकाळी भांडण सोडवणाऱ्यास गेलेल्या पोलिसावर चाकूने वार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना भाईंदर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे व शिपाई गोविंद मुसळे हे शुक्रवारी सायंकाळी साध्या वेशात गस्त घालत असताना शिवसेना गल्लीतील शिव महिमा इमारती जवळ बाबू उर्फ कमलेश गौतम गुप्ता (वय ३०, रा. जे. पी. नगर) हा एका मुलास मारहाण करत होता. गुप्तासोबत दिलीप खाडका (वय ३५, रा. गणेश देवल नगर) हा होता.
आधी गळ्यावर वार, नंतर पोटात खुपसला चाकू
भानुसे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, गुप्ता याने त्यांना धक्का मारून खाली पाडले. भानुसे यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता, तो हातावर लागला. त्यानंतर दिलीप याने भानुसे यांना धक्काबुक्का केली. तर गुप्ता याने भानुसे यांच्या पोटात चाकू खुपसला.
भानुसे यांची प्रकृती सुधारली असून पोलिसांनी गुप्ता व दिलीप ह्या दोघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त दीपाली खन्ना आदीं सह अनेक अधिकाऱ्यांनी भानुसे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.