Join us

सोनाराच्या दुकानांत हातचलाखी करुन सोन्याची चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: January 14, 2023 7:07 PM

अटक आरोपीतील एका आरोपीकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल केली

नालासोपारा (मंगेश कराळे): विरारच्या ज्वेलर्स दुकानात गिऱ्हाईक म्हणून येऊन हातचलाखीने सोन्याचे झुमके चोरून नेणाऱ्या महिलेसह दोन आरोपींना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश मिळाले आहे. अटक आरोपीतील एका आरोपीकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल केली आहे.

विरारच्या फुलपाडा येथील जीवन अपार्टमेंटमध्ये असलेल्या धर्मराज ज्वेलर्स दुकानामध्ये गिऱ्हाईक म्हणुन येवून आरोपींनी हातचलाखीने दुकान मालक पृुथ्वीराज राजपुत यांच्या दुकानामध्ये ३ जानेवारीला चोरी करुन ७ ग्रॅम २०० मिली वजनाचे सोन्याचे दोन झुमके चोरुन घेवून गेले होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नमुद गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा करत होती.

गुन्हयाच्या घटनास्थळी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणावरून सतत नऊ दिवस आरोपीचा शोध घेवुन त्यांची नावे निष्पन्न केली. १२ जानेवारीला घोडबंदर गावातील सिलमेटीक कंपनी येथे सापळा रचून आरोपी राजेश सायबण्णा कुडनुर (३२) आणि अंबरनाथ येथून छाया विनोद चव्हाण (४५) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपूस केल्यावर सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुन्हा करते वेळी वापरलेली ईको मोटर कार, मोबाईल व रोख रक्कम असे एकुण २ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी राजेशवर विरार, तुळींज, माणिकपूर, कासारवडवली आणि अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. 

सदरची कामगिरी गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश आंबुरे, गुन्हे सहाय्यक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरिक्षक राहुल राख, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पोशिरकर,  पोलीस हवालदार आसिफ मुल्ला, महेश वेल्हे, जयकुमार राठोड, सतिष जगताप, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, सुनिल कुडवे, हनुमंत सुर्यवंशी या पथकाने केली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीनालासोपारा