‘फोर्स २’ चित्रपटफुटी प्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: February 8, 2017 05:18 AM2017-02-08T05:18:05+5:302017-02-08T05:18:05+5:30
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा ‘फोर्स २’ हा चित्रपट आॅनलाइन फोडणाऱ्या मध्य प्रदेशातील पिता-पुत्राला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मुंबई : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा ‘फोर्स २’ हा चित्रपट आॅनलाइन फोडणाऱ्या मध्य प्रदेशातील पिता-पुत्राला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
प्रमोद प्रकाश शिवारे (४९), अर्जुन प्रमोद शिवारे (२५) अशी यांची नावे आहेत.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फोर्स २’ हा चित्रपट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. प्रदर्शनाच्या वेळीच हा चित्रपट आॅनलाइन लीक झाला होता. या प्रकरणी निर्माता कंपनी वायाकॉम १८ने के.सेरा.सेरा या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विविध वेबसाइटवर हा चित्रपट उपलब्ध करण्यात आला होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तपासात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर भागातील एका सिनेमागृहातून हा चित्रपट कॉपी करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, तपास पथकाने तेथे धाव घेतली.
स्थानिक गुप्तमाहितीदारांच्या मदतीने पोलीस शिवारे पिता-पुत्रांपर्यंत पोहोचले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले संगणक जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरू आहे, तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली. (प्रतिनिधी)