टास्क फ्रॉड प्रकरणात गुजरातमधून दोघांना बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: December 29, 2023 07:29 PM2023-12-29T19:29:22+5:302023-12-29T19:29:45+5:30
आरोपींच्या बँक खात्यात ६० कोटींचे व्यवहार, माटूंगा पोलिसांची कारवाई
मुंबई: टास्कच्या नावाखाली नागरिकांचे खाते रिकामे करणाऱ्या दुकलीला माटुंगा पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले असता दोन ते तीन महिन्यात ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींशी संबंधीत एक कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी गोठवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा पूर्व येथील वसतिगृहात असताना तक्रारदार क्रिश वर्मा(१९) याला २८ ऑक्टोबरला एक मेसेज आला. मेसेजमध्ये ऑनलाईन नोकरीची आवश्यकता असल्यास कॉल करण्यास सांगण्यात आले. क्रिशने होकार देताच त्याला एका टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी केले. त्यानंतर ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमीष दाखवत जाळ्यात ओढले. चार टेलिग्राम आयडीद्वारे संपर्क साधून आरोपींनी त्याला विविध कामे करण्यास सांगितले. त्याबदल्यात २ लाख ४५ हजार रुपये तक्रारदाराला जमा करण्यास भाग पाडले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार व त्यांचे सायबर पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास करत, रूपेश ठक्कर(३३) व पंकजभाई ओड(३४) या दोघांना गुजरात गांधीनगर येथील कलोल तालुक्यातून अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
३३ डेबिट कार्ड अन ..
आरोपींकडून ३३ डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड,३२ विवध बँक खात्यांचे चेकबुक, सहा मोबाईल, २८ सिमकार्ड, चार कंपन्यांच्या नावाचे बनावट स्टॅम्पर स्टॅम्प हस्तगत करण्यात आले आहेत.
तक्रारदाराची रक्कम २० खात्यात
आरोपींनी वर्मा यांच्याकडून घेतलेली रक्कम २० बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केली होती. त्या बँक खात्यांची तपासणी करताच असता गेल्या दोन ते तीन महिन्यात ६० कोटींहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याशिवाय याप्रकरणी आतापर्तंत एक कोटी १० लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.