कोविड केंद्र गैव्यवहारप्रकरणी दोघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: February 28, 2023 10:04 PM2023-02-28T22:04:24+5:302023-02-28T22:05:15+5:30
हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोविड केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी राजीव ऊर्फ राजू नंदकुमार साळुंखे(४८) व सुनील ऊर्फ बाळा रामचंद्र कदम(५८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याची तक्रार आझाद मैदान पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मचे भागीदार यांनी त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत अनुभव असल्याचे खोटे भासवून पी.एम.आर.डी.ए. व बृहन्मुंबई महानगर पालिका येथे खोटे व बनावट कागदपत्रे सादर करून, जंबो कोविड सेंटर येथे वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत कंत्राट प्राप्त करून शासनाची फसवणूक केली. मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते. त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी लाईफलाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च २०२२ मध्ये सोमय्या यांनी १०० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत न्यायालयातही अर्ज केला होता. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याच प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. यातील साळुंखेला मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"