अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी आत्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:29+5:302021-01-08T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना ऊर्फ गौरी निसरुल्लाह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना ऊर्फ गौरी निसरुल्लाह ऊर्फ समीर शेख (२२) आणि तिचा साथीदार विजय गमरे (२२, रा. कापूरबावडी, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट, आंबेवाडी परिसरातील दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी वागळे इस्स्टेट पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२१ रोजी दाखल केली होती. त्या दोघीही ५ जानेवारी रोजी आपल्या घरासमोर खेळत असताना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रण तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दतात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ, पोलीस हवालदार शिवाजी रावते, पोलीस नाईक सुनील मोरे आणि रत्नदीप शेलार आदींनी आरोपींचा शोध घेतला. तेव्हा ठाण्यातील इंदिरानगर मार्केट परिसरात विजय गमरे घुटमळताना आढळला. तो तेथून निघून जात असताना या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा यातील बेपत्ता दोन्ही मुली त्याच्यासमवेत असलेल्या सुफियाना हिच्यासह त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी असल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी या मुलींचा अवघ्या १२ तासांमध्ये शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले. विजय आणि सुफियाना यांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.