मुंबई : टिक टॉकवरून पोलिसांची थट्टा करणे दोन तरुणांना भलतेच महागात पडले आहे. दुकलीचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच अवघ्या काही तासांतच दोघांना डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे.मोहम्मद हसन युसुफ शेख (२४), आसिफ राशिद शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील आसिफ हा डोंगरी, तर हसन हा पायधुनीचा रहिवासी आहे. त्यांनी पोलिसांची भाईगिरीची भाषा करत थट्टा उडविणारा व्हिडीओ बनवून टिक टॉकवर पोस्ट केला. अडीचच्या आसपास हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत, तत्काळ तपास करत दोघांना अटक केली. तसेच दोघांवरील कारवाईचा तसेच माफी मागितल्याचा व्हिडीओ शेअर केला. या कारवाईमुळे त्यांच्यासारख्या टवाळखोरांना धडा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर लॉकडाउनच्या काळात विविध व्हिडीओ शेअर होत आहेत. महाराष्ट्र सायबरने आतापर्यंत २३० गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामुळे कोणीही अशा प्रकारे व्हिडीओ बनवताना दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे. अशा कुठल्याही स्वरूपाचे व्हिडीओ बनविल्यास पोलीस कोठडीत रवानगी होऊ शकते.
टिक टॉकवरून पोलिसांची थट्टा करणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 6:07 AM