महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:10+5:302021-04-10T04:07:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडून विनयभंग करत छेडछाड करण्यात आली तसेच रिक्षाचालकाला तिने गाडी थांबविण्यास सांगितले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडून विनयभंग करत छेडछाड करण्यात आली तसेच रिक्षाचालकाला तिने गाडी थांबविण्यास सांगितले असता त्यानेही नकार दिल्यानंतर महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अनिकेत महावीर जैस्वाल (२१) आणि सूरजकुमार दूधनाथ राजभर (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंधेरी पूर्वच्या गुंदवली मार्गावर ७ मार्च, २०२१ ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या पीडितेला रिक्षामधील मागे बसलेल्या इसमाने तिच्या छातीला, हाताला स्पर्श करून छेड काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने रिक्षाचालक जैस्वाल याला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र तो मागे बसलेल्या राजभरच्या सांगण्यावरून रिक्षा न थांबवता पुढे जाऊ लागला. त्यावेळी घाबरलेल्या महिलेने चालत्या रिक्षामधून खाली उडी मारली.
त्यात तिच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. याप्रकरणी तिने अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचे रेखाचित्र पोलिसांकडून काढण्यात आले. तसेच घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरामधून संशयित ऑटोरिक्षांचे वर्णन व क्रमांक प्राप्त करून अखेर मंगळवारी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या दोघांनाही समतानगर पोलिसांच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार त्यांना अटक करण्यात आल्याचे अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले.