नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दोघांना अटक, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 05:11 AM2018-09-13T05:11:10+5:302018-09-13T05:11:19+5:30

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना बुधवारी नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आली.

Two arrested in Nalasopara explosives, action of ATS | नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दोघांना अटक, एटीएसची कारवाई

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दोघांना अटक, एटीएसची कारवाई

Next

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना बुधवारी नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सनबर्न फेस्टिव्हल आणि पद्मावत सिनेमादरम्यान बेळगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात दोघांचा सहभाग असल्याची शक्यता एटीएसने न्यायालयात वर्तवली.
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखर्डूली लोधी हे अटकेत आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे हा आकडा नऊवर पोहोचला आहे.
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी तपास करताना एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा करून शूटर सचिन अंधुरे याचा पर्दाफाश केला. सीबीआयने अंधुरेपाठोपाठ एटीएसने अटक केलेल्या कळसकरला अटक केली. तर पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अमोल काळेच्या ताब्यासाठी एटीएसची धडपड सुरू आहे. तो सीबीआयच्या ताब्यात आहे.
याच प्रकरणात, राऊतच्या चौकशीतून लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या कुमार आणि कुरणे यांची नावे समोर आली. बंगळुरूचा कुमार हा ३ महिन्यांपासून तर बेळगावचा कुरणे गेल्या दीड महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्नाटक पोलिसांकडून दोघांचा ताबा मिळताच, बुधवारी दोघांना स्फोटकांप्रकरणी एटीएसने अटक केली. त्यांना सत्र न्यायालयात हजर करीत कोठडीची मागणी केली. स्फोटके प्रकरणात जप्त स्फोटकांमध्येही दोघांचा सहभाग असल्याची शक्यता एटीएसने न्यायालयात वर्तवली. ते वैभव राऊतच्या संपर्कात होते. त्यांनी सोबतच शस्त्र तसेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा संशय एटीएसला आहे. या वेळी आरोपीचे वकील अ‍ॅड. संजीव पुन्हाळेकर यांनी आक्षेप घेतला. राऊतच्या न्यायालयीन कोठडीला १० दिवस होत असताना, त्यांनी आरोपींना उशिराने का अटक केली, असा सवाल केला.
>बेळगावमध्ये घेतले प्रशिक्षण
बेळगावच्या चिखले गावात कुरणेचा फार्महाउस आहे. फार्महाउसच्या मागच्या जंगलात गौरी लंकेश हत्याकांडातील आणि स्फोटके प्रकरणातील काही आरोपींनी प्रशिक्षण घेतल्याचा संशय एटीएसला आहे. त्या दिशेने एटीएस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Two arrested in Nalasopara explosives, action of ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक