Join us

परदेशातील फसवणूकप्रकरणी बिल्डरला धमकविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:09 AM

गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फसवणुकीतील रक्कम परत देण्यासाठी तगादा न लावण्याबाबत बिल्डरला ...

गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फसवणुकीतील रक्कम परत देण्यासाठी तगादा न लावण्याबाबत बिल्डरला गँगस्टरमार्फत धमकविल्याप्रकरणी दोघा जणांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

अनंत शेट्टी (४८ रा. मंगळूर, कर्नाटक) व हेमंत बैंकर (७१, रा. वरळी) अशी त्यांची नावे आहेत. अनंत शेट्टीला कर्नाटकातील चामराज नगरातून तर बैंकरला वरळीतून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दोघे जण गेल्या दोन वर्षांपासून गँगस्टर विजय शेट्टीला माहिती देऊन बिल्डरला धमकी देण्यास लावत होते. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची बैंकर याच्या मुलाने दुबईतील बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली आहे. त्यांच्या नावावर कोट्यवधीचे कर्ज घेतल्याने ते परत करण्यासाठी त्याच्याकडे पाठपुरावा करीत होते. मात्र कर्नाटकातील गँगस्टर विजय शेट्टी त्यांना जुलै २०१९ पासून सातत्याने फोन करून रक्कम परत मागून त्रास देऊ नकोस, नाही तर तुला ठार मारू, अशी वारंवार धमकी देत होते. त्यामुळे त्यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार केलेल्या तपासात अनंत शेट्टी हा विजय शेट्टीच्या सांगण्यावरून बिल्डरला वारंवार धमकावत होता. त्याला कर्नाटकला जाऊन अटक केली. तर हेमंत बैंकर हा बिल्डरबद्दलची सर्व माहिती पुरवीत होता, त्यामुळे त्याला वरळीतील घरातून अटक केली.