मुंबईला मिळाले दोन सहपोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:24 AM2019-05-25T06:24:00+5:302019-05-25T06:24:02+5:30
मुंबई रेल्वे पोलीस दलाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्राची, तर मुंबईतील वाहतूक शाखेच्या रिक्त जागेवर ठाणे शहर पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे तर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांची मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त प्रशासनपदाची जबाबदारी सोपविली आहे.
मुंबई : राज्य पोलीस दलातील २० अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाने शुक्रवारी बढत्या व नवीन नियुक्त्या केल्या. यात मुंबईला दोन सहपोलीस आयुक्त मिळाले, तर पुण्याचे दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे मुंबई रेल्वेचे नवीन पोलीस आयुक्त झाले आहेत.
मुंबई रेल्वे पोलीस दलाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्राची, तर मुंबईतील वाहतूक शाखेच्या रिक्त जागेवर ठाणे शहर पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे तर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांची मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त प्रशासनपदाची जबाबदारी सोपविली आहे. मुंबई शहर पोलीस दलातील संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना बढती देत पुणे शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्या जागी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना पदोन्नती मिळाली. परिमंडळ ८ चे उपायुक्त अनिल कुंभारे यांना बढती देत ठाणे शहर पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन म्हणून, तर सशस्त्र पोलीस बल, मरोळ येथील उपायुक्त एस. येनपुरे यांना अप्पर पोलीस आयुक्त पदावर बढती देऊन ठाणे शहर पोलीस दलातील पश्चिम विभागात नेमणूक झाली.
राज्य पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांची नवी मुंबई पोलीस दलात सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या जागी मुंबईतील उत्तरचे अप्पर आयुक्त राजेश प्रधान यांना बढती मिळाली. त्यांच्या नियुक्तीने रिक्त जागेवर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांना बढती मिळाली. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची पोलीस अधीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे हे पद पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
ठाणे शहर पोलीस दलातील पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त सत्यनारायण यांची पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी. सुरक्षा हे पद पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे करून नियुक्ती झाली. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांच्यावर पुणे शहर पोलीस दलातील दक्षिण विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्य गुप्तवार्ता विभाग उपायुक्तांना बढती
राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रामनाथ पोकळे यांची बढती देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती झाली. पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांना बढती देत पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र हे पद विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे करून त्यांची येोि नेमणूक करण्यात आली आहे.