Join us

वाशी खाडीपुलावरून दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: April 09, 2016 3:38 AM

वाशी खाडीपुलावरून उडी मारून दोघा अल्पवयीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्याला खाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून उडी मारून दोघा अल्पवयीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्याला खाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ते सिगारेट ओढत असताना त्यांना एका व्यक्तीने पकडले होते. परंतु त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पैशाची मागणी केल्यामुळे त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नात खाडीपुलावरून उडी टाकली.गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यामध्ये बचावलेला निखिल गड्डम (१६) हा पाच तास खाडीच्या गाळात अडकून पडलेला होता. तर त्याचाच मित्र ऋतिक पटेकर (१७) याचा मृतदेह सकाळी ८ वाजता पोलिसांच्या हाती लागला. हे दोघेही दहावीचे विद्यार्थी असून वडाळा येथील राहणारे आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हे दोघे आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे चौघे जण भेटले होते. परंतु यावेळी ते चौघेही सिगारेट ओढत असताना एका व्यक्तीने त्यांना हटकले होते. शिवाय तिघांचे मोबाइल घेऊन ते मोबाइल परत मिळवण्यासाठी तसेच पोलिसांच्या ताब्यात न देण्यासाठी त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे निखिल व ऋतिक यांनी त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी केली. परंतु कुठूनच पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेत ते वाशी खाडीपुलाकडे रेल्वेने आले होते. त्यांना यापूर्वीही सिगारेट ओढताना घरच्यांनी पकडलेले असल्यामुळे दुसऱ्यांदा पकडले जाण्याची त्यांना भीती होती. या भीतीपोटी त्यांनी वाशी खाडीपुलावरून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उडी टाकली. यावेळी ऋतिक हा पोहता येत नसल्याने बुडाला तर निखिल याने बचावासाठी प्रयत्न केल्याने तो किनाऱ्यापर्यंत पोचला . परंतु त्या ठिकाणी तो सुमारे पाच तास गाळात अडकून होता. रात्रभर मदतीसाठी त्याने आरडाओरड करूनही त्या ठिकाणी ऐकणारे कोणीच नव्हते. अखेर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टोलनाक्यावर चहा घेऊन येणाऱ्या चहावाल्याने त्याचा आवाज ऐकला. त्याने गाळामध्ये अडकलेल्या निखिल याला पाहताच पोलिसांना कळवले. यावेळी मच्छीमार जोशी यांच्या बोटीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. प्रथम त्याने पोलिसांना खोटी माहिती दिली होती. परंतु सकाळी ऋतिक याचाही त्या ठिकाणी मृतदेह सापडल्यानंतर घडलेल्या संपूर्ण प्रकाराची त्याने माहिती दिल्याचे पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)