Join us

भाड्याने घर घेण्यासाठी टू बीएचकेलाच प्राधान्य, मुंबईत भाड्याच्या दरांमध्ये वाढ, अंधेरीला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 9:26 AM

Rent Rates in Mumbai : मॅजिकब्रिक्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार भाड्याने घर शोधतेवेळी ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य टू बीएचके फ्लॅटलाच दिल्याचेही दिसून येते. घराच्या शोधात असलेल्या लोकांपैकी ४५ टक्के लोक टू बीएचके प्लॅटच्या शोधात असल्याचे या अहवालात नमूद आहे.

मुंबई : कोरोनाचा कठीण काळ... त्यात नोकऱ्यांमध्ये अस्थिरता... रोजगाराची हमी नाही.. हे कमी म्हणून की काय गेल्या नऊ महिन्यांत व्याजदरात सहा वेळा झालेली वाढ आणि आर्थिक अनिश्चिततेचे ढग अधिक गडद, अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना मुंबईकरांनी स्वत:चे घर घेण्याऐवजी भाड्याच्या घरात राहण्यास पसंती दिल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.

मॅजिकब्रिक्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार भाड्याने घर शोधतेवेळी ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य टू बीएचके फ्लॅटलाच दिल्याचेही दिसून येते. घराच्या शोधात असलेल्या लोकांपैकी ४५ टक्के लोक टू बीएचके प्लॅटच्या शोधात असल्याचे या अहवालात नमूद आहे.

गृहविक्री व्यवहारात कार्यरत मॅजिकब्रिक्स या संस्थेने मुंबई शहर व उपनगरातील भाडेतत्त्वावरील घरासंदर्भात असलेल्या ट्रेन्डची माहिती देणारा अहवाल नुकताच सादर केला. यानुसार, भाडेतत्त्वावर घर घेतेवेळी लोकांनी किमान ५०० ते कमाल एक हजार फुटांपर्यंतच्या घरांच्या शोधाला अधिक पसंती दिली आहे. 

यामध्ये ५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेच्या शोधाला सुमारे ५२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घराला ४२ टक्के लोकांनी पसंती दिल्याचे  दिसून येते.  भाड्याने घर घेणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने अंधेरी (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) या परिसराला पसंती देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.- ५% चालू आर्थिक वर्षाच्या मागील तिमाहीपेक्षा यंदाच्या तिमाहीत मुंबईतील भाड्याच्या दरात पाच टक्के वाढ नोंदली गेली आहे. - संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर  पै यांनी सांगितले की, २०२२ या वर्षाच्या पहिल्या दोनही तिमाहींमध्ये देशातील भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या घरांची बाजारपेठ स्थिरपणे पूर्वपदावर आली. - गेल्या काही महिन्यात वाढलेले व्याजदर आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे अनेक लोकांनी आपला गृहखरेदीचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत भाड्याने घर घेण्याचा लोकांचा कल वाढताना दिसत आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबई