Join us

बनावट विमान तिकीट प्रकरणी दोघांवर गुन्हा; बहिणीला सोडायला जाण्यासाठी पराक्रम

By गौरी टेंबकर | Published: May 14, 2024 2:22 PM

बाहेरगावी निघालेल्या बहिणीला सोडायला जाण्यासाठी त्यांनी केल्याचे पोलिसांकडे कबूल केले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील फैजल बलवा आणि फैजान बलवा या दोघा भावांवर सहार पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बनावट विमान तिकिटे वापरत गेटमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. जे बाहेरगावी निघालेल्या बहिणीला सोडायला जाण्यासाठी त्यांनी केल्याचे पोलिसांकडे कबूल केले.

सहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, येथे तैनात सीआयएसएफ कॉन्स्टेबल एक्झिट गेट्स ३ आणि ६ याठिकाणी त्या प्रवाशांच्या तपशीलांची नोंदणी केली जाते जे अचानकपणे त्यांचा प्रवास रद्द करतात आणि ज्यांना प्रवास करण्यास मनाई आहे.  त्यानुसार १२  मे रोजी दुपारी ३.२५ वाजता फैजल आणि फैजान यांनी गेट क्र. ३ येथील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी ते  प्रवास रद्द का करत आहेत याबद्दल विचारले. मात्र ते दोघे कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

पुढील तपासात असे दिसून आले की दोन्ही व्यक्तींकडे विस्तारा एअरलाइन्सची (UK-285 मुंबई ते दोहा) विमानाची तिकिटे होती, परंतु ती स्कॅन करता येत नव्हती. तसेच ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्र. ४ येथे दुपारी २.२० वाजता कोणत्याही सामानाशिवाय असल्याचे आढळून आले. त्यांच्या सामाना बद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देण्यास त्यांच्या असमर्थतेमुळे सुरक्षा अधिकाऱ्यामध्ये संशय निर्माण झाला. त्यानंतर, सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी विस्तारा एअरलाइन्सशी संपर्क साधला आणि फैजल व फैजान यांच्याकडे असलेली फ्लाइट तिकिटे बनावट असल्याचे उघड झाले. अधिक चौकशीत उघड झाले की त्यांची बहीण, सुनेसरा रशीद ही मुंबईहून दोहाला जात होती आणि तिच्यासोबत मोठ्या बॅगा होत्या. तिला सोडायला जाण्यासाठी फैजल आणि फैजान यांनी तिच्यासोबत विमानतळावर प्रवेश मिळवण्यासाठी बनावट तिकिटांचा वापर केला होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात कलम ३४ (सामान्य हेतू), ४२० (फसवणूक) तसेच अन्य सबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :विमानतळ