मुंबई : परीक्षेत नापास झाल्यामुळे आसाममधील नववीच्या विद्यार्थ्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने पैसे कमविण्यासाठी विमानाने मुंबई गाठली. मुले विमानाने मुंबईच्या दिशेने निघाल्याचे समजताच पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या मदतीने विमानतळावरून मुलांना ताब्यात घेण्यात आले. मुले सुखरूप असल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी आसामच्या दुमदुमा पोलिस ठाण्यात केली होती. मुले विमानाने मुंबईला निघाल्याचे समजताच पालकांनी पोलिसांना कळवले. सहार पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमाशुल्क दल यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर शोध सुरू केला. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास आलेल्या विमानातून दोन्ही मुले मुंबई विमानतळावर उतरताच, त्यांना सहार पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आकर्षणचौकशीत दोन्ही मुले इयत्ता नववीच्या घटक चाचणी परीक्षेत नापास झाले होते. त्यामुळे आता पुढे शाळा सोडून व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबाबत ऑनलाइन सर्च केले असता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने व्यवसाय करून भरपूर पैसे कमविले जाऊ शकतात, असे त्यांना समजले. याबाबत कुटुंबीयांना सांगितले, तर ते परवानगी देणार नाही. म्हणून दोघांनीही कुटुंबीयांना न सांगता मुंबई विमानाची तिकिटे काढली. ठरल्याप्रमाणे दोघेही रवाना झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांना मुले सुखरूप भेटल्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार कुटुंबीय मुंबईकडे यायला निघाले आहे.
...अन् मिळाली तपासाला दिशामुलांनी घरातून निघताना तिजोरीतील ८० हजार आणि एक मोबाइल सोबत घेतला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबले. मुले बेपत्ता होताच कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले. काही लोकल चॅनेलने मुलांची बातमी दाखवताच तेथील हॉटेल मॅनेजरने मुले हॉटेलमध्ये थांबले होते, असे सांगितले. त्यानुसार, सीसीटीव्हीच्या मदतीने मुले ज्या वाहनातून गेले त्या चालकापर्यंत पोलिस पोहोचले. तेव्हा, प्रवासादरम्यान मुले विमानाने मुंबईला पैसे कमविण्यासाठी जात असल्याचे त्याने ऐकले होते. पुढे हाच धागा पकडून मुलांची माहिती मिळताच आसाम पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला.