Join us

ब्रिटनचा कोरोना झालेल्या पाचपैकी दोन प्रवासी आता निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूची लागण मुंबईतील पाच प्रवाशांना झाली असल्याचे सोमवारी उजेडात आले. त्यानंतर महापालिकेच्या ...

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूची लागण मुंबईतील पाच प्रवाशांना झाली असल्याचे सोमवारी उजेडात आले. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने संबंधित प्रवाशांच्या संपर्कातील आतापर्यंत ४० लोकांची तपासणी केली आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून आलेले नाही, तर पाचपैकी दोन प्रवासी कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रिटनवरून २५ नोव्हेंबर २०२० नंतर आलेल्या प्रवाशांची पालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी सुरू आहे. तसेच २१ डिसेंबर २०२० पासून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. या तपासणीत आतापर्यंत ३२ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी दहा प्रवासी कोरोनामुक्त झाले असून, सर्वांचे चाचणी अहवाल पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’कडे पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तिथून आलेल्या अहवालानुसार पाच प्रवाशांना ब्रिटनमधील कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आले. त्यामुळे या प्रवाशांचा व त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध महापालिकेने सुरू केला. त्यानुसार पाचपैकी दोनजण आता निगेटिव्ह असून, उर्वरित तीन प्रवासी अद्यापही पॉझिटिव्ह असल्याने पालिका यंत्रणा सतर्क आहे. या पाच प्रवाशांच्या संपर्कातील आतापर्यंत ४० लोकांची चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.