महामार्गावर ओव्हरटेकच्या नादात दोन कारची ठोकर
By admin | Published: May 23, 2015 10:35 PM2015-05-23T22:35:21+5:302015-05-23T22:35:21+5:30
झेन कार व झायलो कार यांच्यात जबरदस्त धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण उपचारादरम्यान मयत झाला असून ३ जण जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरपासून जवळच हॉटेल सीमा इन पार्क ढाब्यासमोर झेन कार व झायलो कार यांच्यात जबरदस्त धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण उपचारादरम्यान मयत झाला असून ३ जण जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलादपूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय दत्तात्रेय काजरेकर (३५) हे आपल्या ताब्यातील झेन कार घेऊन मुंबईहून कणकवलीला जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल सीमा इन पार्क ढाब्यासमोर आले असता ओव्हरटेकच्या नादात पोलादपूरकडून मुंबई दिशेने जाणाऱ्या झायलो कारला जोरदार ठोकर दिली. या अपघातात झेन कारमधून प्रवास करणारे चालक उदय काजरेकर गंभीर जखमी झाले. त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला तर उदय यांची पत्नी प्रिती व भाऊ महेश महादेव काजरेकर हे दोघे गंभीर जखमी झाले, तर त्यांची १ वर्षाची लहान मुलगी गिरीजा ही किरकोळ जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस इन्स्पेक्टर सुरेश अंधारे, पो. उपनिरीक्षक महाजन, प्रमोद लांगी, सावंत, पिंगळे, बडे, गुंजाळ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातातील इतर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी महाड येथे हलविले आहे.
या घटनेची माहिती समजताच जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, देवळे सरपंच प्रकाश कदम, माजी सरपंच मनोज प्रजापती दशरथ उतेकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)