ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:49 IST2025-01-07T10:36:18+5:302025-01-07T10:49:11+5:30
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क!
Taj Hotel Same Number Plate Car :मुंबईतील ताज हॉटेलसमोर सोमवारी एकाच नंबर प्लेटची दोन वाहने आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ती वाहने ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे. ताज हॉटेलसमोर दुसरे वाहन उभे असल्याची माहिती मूळ वाहनाच्या चालकाने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस तपासानंतर या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या बाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या उभ्या असल्याचे आढळल्यान हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पांढऱ्या रंगाच्या दोन्ही गाड्यांना पिवळ्या नंबरप्लेट होत्या. दोन्ही वाहनांवर MH 01 EE 2388 क्रमांक दिसत होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे या भागात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. असे असतानाही एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या आढळून आल्याने मूळ मालकाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गाड्या कुलाबा पोलीस ठाण्यात आणून चालकांची चौकशी सुरु केली. या चौकशीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट नंबर प्लेट बनवून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात मूळ मालक साकीर अली यांनी तक्रार दिली आहे. साकीर अली यांनी सांगितले की, "मी नरीमन पॉईंट येथे कार चालवत होतो. मात्र गेल्या आठ महिन्यापासून माझा नंबर असलेली दुसरी गाडी रस्त्यावर चालवली जात असल्याचे मला समजले. त्यामुळे त्या गाडीला बसत असलेले सर्व दंड मला बसत होते. एक दोन तीन वेळेला मी ते दंड भरले पण सातत्याने असे व्हायला लागल्यानंतर मी आरटीओकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी मी प्रवाशांना ताज हॉटेल येथे सोडण्यासाठी आलो तेव्हा माझ्याच शेजारी माझ्याच नंबरची गाडी मला दिसली. त्यानंतर याबाबत करण्यासाठी त्याच्याजवळ गेलो असता त्याने चावी काढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या टॅक्सी चालकांनी आणि पोलिसांनी त्याला पकडले."
पोलिसांच्या चौकशीत आरोपी ड्रायव्हर प्रसाद चंद्रकांत कदम याने त्याच्या कारचा क्रमांक MH 01 EE 2383 ऐवजी MH 01 EE 2388 असा करुन घेतला होता. प्रसाद कदमने कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते, मात्र त्याला हप्ते भरता येत नव्हते. ज्या फायनान्स कंपनीकडून त्याने कर्ज घेतले होते ते आपली कार जप्त करतील अशी त्याला भीती होती. त्यामुळे त्याने बनावट नंबर प्लेट बनवण्याचे ठरवलं. अलीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून कदमला अटक करण्यात आली आहे.