आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवरील दोन गुन्हे रद्द; फोन टॅपिंगप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:25 AM2023-09-09T06:25:23+5:302023-09-09T06:25:37+5:30
युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द करणे योग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
मुंबई : राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले.
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. शुक्ला यांच्यावर खटला चालविण्यासाठी सरकारने सीआरपीसी १९७ अंतर्गत परवानगी नाकारली, असे पोलिसांतर्फे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले. पुणे पोलिसांनी जानेवारीत याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे आणि तक्रारदाराने निषेध याचिका दाखल केली नाही, असे सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. हा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द करणे योग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले.