मुंबई : पालिकेच्या उद्यानातील भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू पावलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती मुंबई पालिकेने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. उद्यानाची देखभाल करण्यास जबाबदार असलेला संबंधित कंत्राटदार नुकसानभरपाईची रक्कम पालकांना देईल, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल सिंह यांनी न्या. गौतम पटेल व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाला दिली.
काही दिवसांपूर्वी चार व पाच वर्षांची दोन मुले हरवल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी या दोन्ही मुलांचे मृतदेह वडाळा येथील महर्षी कर्वे उद्यानातील पाण्याच्या टाकीत आढळले होते.
स्वयंप्रेरणेने जनहित याचिका
उच्च न्यायालयाने या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. नुकसानभरपाई म्हणून कंत्राटदार पालकांना प्रत्येक मुलापाठी पाच लाख असे मिळून दहा लाख रुपये देणार आहे, असे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सिंह यांनी केलेले विधान मान्य करत पुढील सुनावणी जूनमध्ये ठेवली.