मुंबई : रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाच्या सुविधा देणा-या दोन अनुभूती बोगी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यानुसार एक अनुभूती बोगी पश्चिम रेल्वेत आली आहे. लवकरच दुसरी अनुभूती बोगीदेखील प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली.हाय-लक्झरी अशा प्रकारातील अनुभूती बोगी पश्चिम रेल्वेतील शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून या बोगीमार्फत करण्यात येणार आहे. या बोगीसाठी प्रत्येकी सुमारे २.९० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अनुभूतीमध्ये ५६ आसने आहेत. चेन्नईच्या आयसीएफमध्ये दहा अनुभूती बोगी बनवण्यात येतील. यातील दोन पश्चिम रेल्वेला मिळतील.अनुभूती बोगीच्या मागच्या बाजूला एसी कम्प्रेसरमधून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत देखभाल विभागाकडून अधिक माहिती घेतली असता, ज्या ठिकाणाहून पाणीगळती होते. त्या ठिकाणी लांबी भरण्याचे काम अपूर्ण आहे. लांबी भरून ही गळती रोखणे शक्य आहे. मात्र, गळती नसून बायोटॉयलेटचे काम सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेसाठी दोन ‘अनुभूती’ बोगी, रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:30 AM