नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही पक्षाच्या दोन नगरसेविका व दोन माजी नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार आहेत. सुरेखा इथापे व माजी नगरसेवक रवींद्र इथापे तर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीला नेरूळमध्ये फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये फूट पडू लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट करणा-या विद्यमान नगरसेविका सुरेखा इथापे व माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी पक्षाला रामराम करून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अचानक त्यांनी पुन्हा भाजपाच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी नेरूळ भीमाशंकर सोसायटीच्या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला जाणार असून त्याची तयारीही सुरू केली आहे.तसेच सीवूडमधील पक्षाच्या नगरसेविका कविता जाधव व त्यांचे पती माजी नगरसेवक भरत जाधव यांनीही पक्ष सोडण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ते भाजपा व शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु नुकतीच शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे ते शेकापमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर आणखी काही नगरसेवक पक्षांच्या तयारीत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
दोन नगरसेविकांचा राष्ट्रवादीला रामराम?
By admin | Published: February 26, 2015 1:23 AM