मुंबई : सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या अवाढव्य मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या केवळ ५७ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात असून तब्बल ३७ हजार ५०० कर्मचारी मराठा सर्वेक्षण आणि निवडणूक कामात गुंतले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बहुतेक कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.
आशियातील सर्वात मोठी महापालिका, अब्जावधींचा अर्थसंकल्प वगैरे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी तेवढेच तगडे मनुष्यबळ असणे अपेक्षित आहे. कागदोपत्री कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख ४० हजार आहे. मात्र, बरीच पदे रिक्त असल्याने हा आकडा थेट ९५ हजारांवर येऊन ठेपतो. आता या उपलब्ध मनुष्यबळातून पालिकेने ३० हजार कर्मचाऱ्यांना मराठा सर्वेक्षणाच्या कामाला जुंपले असून, साडेसात हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. उरलेल्या ५७ हजार ५०० कर्मचाऱ्यांवर - म्हणजे निम्म्याहून थोडे अधिक - मुंबापुरीतील सुमारे दोन कोटी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची भिस्त आहे.
पालिका मुख्यालयात आणि वॉर्डात मुंबईकरांचा ज्या लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांशी प्रामुख्याने संबंध येतो, त्याच पदावरील कर्मचाऱ्यांचा सर्वेक्षण, निवडणुकीच्या कामात समावेश झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार तर वाढलाच आहे, शिवाय लोकांना खेटे घालावे लागत आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी गेलेले साडेसात हजार कर्मचारी निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत पुन्हा पालिकेतील त्यांच्या मूळ पदावर येण्याची शक्यता कमीच आहे. मराठा सर्वेक्षणाच्या कामात गुंतलेले ३० हजार कर्मचारी ३१ जानेवारीनंतर पुन्हा मूळ पदावर रुजू होतील. परंतु त्यापैकी बहुतेकांना निवडणुकीच्या कामाचे ‘निमंत्रण’ येण्याची शक्यता आहे, असे पालिकेत म्हटले जाते.
कामाचा भार वाढला :
मराठा सर्वेक्षणाच्या कामात तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून इंजिनीअर, परिचारिका, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक शाखा आदी विविध खात्यांतील वरिष्ठ आणि कनिष्ठ पदावरील कर्मचारी गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यातही कामाचा भार वाढला आहे. शहर आणि उपनगराच्या सर्व विभागांतील अनेक कर्मचारी पालिकेचे काम सोडून दुसरी कामे करत असल्याने कारभार विस्कळीत झाला आहे.
प्रकल्पांच्या कामावरही परिणाम होणार :
फायली आणणे, विविध खात्याकडे पाठवणे, ड्राफ्ट तयार करणे, काही दस्तावेज डिस्पॅच करणे अशा सगळ्याच कामांवर परिणाम झाला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यातच पालिकेचे इंजिनीअरही अन्य कामात गुंतले असल्याने प्रकल्पांच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवणे क्रमप्राप्त आहे.