Join us

२ कोटींच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Published: March 17, 2017 3:45 AM

खेरवाडीत बुधवारी रात्री जवळपास दोन कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खेरवाडी पोलिसांना मिळालेल्या ‘टीप’वरून बुधवारी रात्री कारवाई करण्यात आली

मुंबई : खेरवाडीत बुधवारी रात्री जवळपास दोन कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खेरवाडी पोलिसांना मिळालेल्या ‘टीप’वरून बुधवारी रात्री कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चौघांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले आहे. खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोहन कदम यांनी त्यांचे सहकारी कुकलारे यांच्या मदतीने वांद्रेतील २७६ क्रमांकाच्या इमारतीजवळ बुधवारी रात्री सापळा रचला. तेव्हा रात्री ९च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची आॅडी या ठिकाणी आली. त्यानुसार या पथकाने लगेचच ही गाडी अडवत ती ताब्यात घेऊन झडती घेण्यास सुरुवात केली. या गाडीत २ कोटी १ लाख ६२ हजार ५०० रुपयांच्या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. गाडीत असलेल्या विनोद देसाई, सचिन सुमरिया, इमताज मुलानी आणि सुरेश कुंभार या चौघांना अटक केली. ठाण्यातही कारवाईठाण्यातही जुन्या नोटा ७० टक्के कमिशन घेऊन बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच या चौकडीला पकडल्याची माहिती वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांनी दिली. चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कारमधून चौघे जण येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे हवालदार स्वप्निल पाटील यांना मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, आर.पी. चौधरी, उपनिरीक्षक पी.व्ही. चौधरी आदींच्या पथकाने १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास हॅपी व्हॅली सर्कल ते नीळकंठ सोसायटी रस्त्यावर सापळा लावला. त्या वेळी एका कारमधून आलेल्या प्रल्हाद परीट, आशिष कदम, सतीश नाईक आणि रूपेश पवार या चौघांना घेराव घालून या पथकाने पकडले. (प्रतिनिधी)