Join us

केंद्र सरकारच्या जागेवर खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार; वृद्धाची २० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 6:11 AM

वृद्धाची २० लाखांची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : केंद्र सरकारच्या मालकीची जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून एका भामट्याने वृद्धासोबत खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार केला. त्यापैकी २० लाख घेऊन गंडविल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीत समोर आला आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 

कांदिवली परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय गुलाबचंद सिंग यांची यात फसवणूक झाली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अख्तर मलिक, शैलेंद्र सिंग आणि राधेश्याम यादव विरुद्ध गुन्हा नोंदवित पोलिस अधिक तपास करत आहेत. या त्रिकुटाने २१ जानेवारी २०२० ते २८ मार्च दरम्यान ही फसवणूक केली. सिंग यांच्या तक्रारीवरून, त्यांच्या एज्युकेशन ट्रस्टसाठी शाळा बांधण्यासाठी मोकळ्या जागेचा शोध सुरू असताना त्यांची त्रिकुटासोबत भेट झाली. त्यांनी, पालघर जिल्ह्यातील चुन्द्रा गावातील एक प्लॉट स्वतःच्या मालकीचा असून विकायचा असल्याचे सांगितले. सिंग यांनाही जागा आवडल्याने त्यांनी व्यवहार करण्याचे ठरवले. 

जागेसंदर्भातील बनावट कागदपत्र खरे असल्याचे दाखवून, जागेचा खरेदीचा करार दोन कोटींचा केला. तसेच, त्यासाठी २० लाख रुपये घेत, लवकरच जमीन नावावर करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर टाळाटाळ सुरू झाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी चौकशी करताच ती जागा केंद्र सरकारच्या मालकीची असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. अखेर फसवणूक झाल्याची खात्री होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

बनावट कागदपत्रांचा आधार

दाखल गुन्ह्यातील आरोपींनी त्या पैशांचे काय केले? त्यांनी अशाच प्रकारे आणखीन कुणाची फसवणूक केली आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. तक्रारदार यांनी व्यवहाराचे कागदपत्र पोलिसांना दिले आहे. आरोपींनी यामध्ये बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. ही कागदपत्रे कुणाकडून बनवून घेतली? याबाबतही तपास सुरू आहे.

टॅग्स :धोकेबाजीपोलिस