दोन कोटीचे दागिने, लाखोची रोख पळवणारी टोळी गजाआड ! उत्तर प्रदेशमध्ये खार पोलिसांची कारवाई
By गौरी टेंबकर | Published: May 7, 2024 03:15 PM2024-05-07T15:15:42+5:302024-05-07T15:18:02+5:30
घरमालक कुटुंबासोबत गोवा फिरायला गेल्याचा फायदा उचलत त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराने करोडोचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केली.
गौरी टेंबकर, मुंबई: घरमालक कुटुंबासोबत गोवा फिरायला गेल्याचा फायदा उचलत त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराने करोडोचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केली. तपासामध्ये सदर आरोपी हा आंतरराजज्यीय टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले आणि त्याच्यासह एकूण तिघांना खार पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केली. तर त्यांच्या एका पसार साथीदाराचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटक आरोपींची नावे निरंजन बहेलिया (४१) रामचेलवा मैकू पासवान ऊर्फ गुटिया (२६) आणि जयप्रकाश रस्तोगी (५९ ) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खार पश्चिमच्या राजवीर अपार्टमेंटमध्ये असलेल्या सहाव्या मजल्यावरील कुटुंबाकडे आरोपी निरंजन घरकाम करत होता. सदर कुटुंबीय हे २२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान गोवा फिरायसाठी गेले होते. तेव्हा निरंजनने त्यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडून २ कोटी रुपयांचे सोने चांदी तसेच हिऱ्याचे दागिने आणि ७ लाख रूपये रोख रक्कम पळवून नेली.
याप्रकरणी खार पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा नोंद करत पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपशिका वारे, वैभव काटकर(गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक संदीप गवळी आणि पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कुंभारे, भीमराव धापटे, सहाय्यक फौजदार मनोज वैद्, हवालदार आनंद निकम, विनोद मदतवाडकर,शिपाई मारुती गळवे, वैभव घाटकर आणि गणेश हंसनाले या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास तसेच साक्षीदारांकडे चौकशी केली. तेव्हा या गुन्ह्यात आंतरराज्यिय गुन्हे करणाऱ्या टोळीचा हात असल्याचे उघड झाले ज्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्हाचे असल्याने तपास पथक त्याठिकाणी पाठविण्यात आले.
मात्र, आरोपी हे मोबाईल वापरत नसुन रोज राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने अखेर स्थानिक नेटवर्क वापरत निरंजन आणि रामचेलवा याना अटक केली गेली. निरंजनवर कफ परेड तसेच नाशिकच्या अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर राम चेलवा देखील अभिलेखावरील आरोपी असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली १.४५ केलेल्या लाखांची रोकड हस्तगत करत तिसरा आरोपी जयप्रकाश याचा शोध घेऊन त्याची घरझडती घेतली घेत १.०१ कोटी रुपये किमतीचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करत त्याला अटक केली गेली. त्यांचा चौथा साथीदार जवाहर पांडे उर्फ बच्चन हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्याच्याकडे चोरीचा उर्वरित मुद्देमाल असल्याची माहिती आहे.