मान्सून दोन दिवसांचा पाहुणा; लवकरच परतीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:19 AM2019-10-09T04:19:51+5:302019-10-09T04:20:02+5:30
११ आणि १२ आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
मुंबई : उत्तर आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण घटले असून, मान्सूनच्या परतीच्या प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, बुधवारसह गुरुवारनंतर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थानातून सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार असतानाच महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस नोंदविला जाईल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातून मान्सून परतण्याचा अंदाजही हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ९ आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १० आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ११ आणि १२ आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
दरम्यान, ९ आणि १० आॅक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी/रात्री आकाश अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील हवामान राहणार कोरडे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाळी हालचाली सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांच्या कालावधीत अहमदनगरमध्ये ३० मिमी तर महाबळेश्वरमध्ये ११.१ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकणातील रत्नागिरी व हर्णे येथे ११ मिमी आणि १०.९ मिमी पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात आणखी काही काळ पाऊस पडण्याची शक्यता असून, प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर येथे पुढील २४ तासांत एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पुणे शहरावर तुरळक सरींची शक्यता आहे.
२४ तासांनंतर राज्यातील बहुतांश भागांतील पावसाळी हालचालींमध्ये लक्षणीय घट होईल. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल.
दक्षिण कोकण आणि गोवा, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ११ किंवा १२ आॅक्टोबरपर्यंत तुरळक पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.